
सोयगाव दि. ०७ (वृत्तसेवा) सोयगाव तहसीलदार दाखवा अन अकरा हजार रुपये बक्षिस मिळवा अशी जाहीर योजना बहुजन पक्षाचे वतीने सोमवार पासून राबविण्यात येत आहे. याबाबत बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष संघपाल सोनवणे यांनी उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना शुक्रवारी लेखी निवेदन दिले आहे.
सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड या तहसील कार्यालयात हजरच रहात नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहे. सध्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऍग्रीस्टॅकची नोंदणी सुरू आहे. परंतु तहसीलदारच सतत गैरहजर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. खरिपाच्या पीक कर्जाच्या बाबतीत राष्ट्रीय कृत बँकांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही याकडे तहसीलदार यांचे दुर्लक्ष झाले आहे. आठवड्यात एक किंवा दोन दिवस तहसीलदार मनिषा मेने या कार्यालयात उपस्थित राहतात इतर दिवस त्या फर्दापुर येथे शासकीय विश्राम गृह, व एम.टी.डी.सी. विश्राम गृह या ठिकाणी बसून कामकाज करतात असे निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष संघपाल सोनवणे यांनी उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना लेखी निवेदन देऊन सोमवार पासून सोयगाव तहसील कार्यालयात व तालुक्यात तहसीलदार शोध मोहीम राबवून तहसीलदार दाखवा अन अकरा हजार रुपये बक्षिस मिळवा अशी योजना राबविणार आहे असे निवेदनात नमूद आहे.


