सोयगावात सत्ताधारी पक्षाकडून आदर्शआचारसंहितेचा भंग, पोलीसांनी लावलेल्या बॅरिकेटलाच लावले पक्षाचे ध्वज..
गुन्हे दाखलकरण्याची हिम्मत निवडणूक आयोगात आहे का? नागरिकांचा सवाल....

सोयगाव दि. २३ (वृत्तसेवा) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयगाव शहरात शिवसेना (शिंदे गट) उमेदवार अब्दुल सत्तार व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत व राजकीयनेत्यांचे फोटो व चिन्ह असलेले ध्वज फिरकवत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात दि. २३ बुधवार रोजी सायंकाळी उघडकीस आल्याने रॅली ची परवानगी घेण्यात आली किंवा नाहीयाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास अधिकारी धजावत नसल्याने नागरिकांमधून आदर्श आचारसंहिता नावालाच असल्याचेबोलले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार अब्दुल सत्तार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सोयगाव, आमखेडा येथे दि. २३ बुधवार रोजी सायंकाळी रॅली काढली होती. यात शहरात व आमखेडा गावात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी पक्षाचे चिन्ह व राजकिय नेत्यांचे फोटो असलेले झेंडे कार्यकर्ते रॅलीमध्ये भिरकवत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासकीय मालमत्ता असलेल्या पोलिसांचे बँरिकेटवर राजकीय पक्षाचा झेंडा बाधण्यात आला होता. त्या बाबत स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाने बघायची भूमिका घेतल्याने निवडणूक विभाग सोयगाव तालुक्यात निद्रावस्थेत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. सोयगाव शहर व आमखेडा गावात रॅली काढण्या संदर्भात नियमानुसार निवडणूक विभागाकडून परवानगी घेण्यात आली किंवा नाहीयाबाबत आचारसंहिता प्रमुख रत्नाकर पगार यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असतात्यांनी प्रतिसाद त्यांनी दिला नाही. यामुळे नागरिकांमध्ये आचारसंहिते विषयी प्रश्न चिन्हनिर्माण झाले आहे. निवडणूक विभागाने आदर्श आचारसंहिता पथक तयार केले आहे. परंतु यापथकाच्या अधिकाऱ्यांमध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची हिम्मत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. सोयगाव तालुक्यात आदर्श आचारसंहिता पथक हे नावालाच असून विधानसभेची निवडणूक पारदर्शक पार पडेल किंवा याविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. आचारसंहिता पथक प्रमुख माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने सिल्लोड – सोयगाव आदर्श आचारसंहिता पथकाची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगा कडे करणार असल्याचे संदीप इंगळे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.



