फर्दापूर येथे अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू, तलाठीचा झिरो वसुलीत झाला हिरो…

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे अवैधरीत्या वाळूची सर्रास वाहतूक केली जात असल्याबाबत दि. २५ शुक्रवारी फर्दापूर तलाठी श्रीमती शिल्पा बोपटे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. फर्दापूर तलाठी कार्यालयाचा झिरो शुभम रावळकर हा घटनास्थळी येऊन संबंधित ट्रॅक्टर चालकास मंडळ अधिकारी व कोतवाल येत असल्याची माहिती दिली. पथक येण्यापूर्वीच ट्रॅक्टर चालकाने धूम ठोकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने महसुलच्या भरारी पथकावर झिरो भारी झाला आहे. तलाठ्याची वसुली झिरो करीत असल्याने महसुलाचा हिरो झाल्याची चर्चा येथे नागरिकांमध्ये रंगली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील वाघूर नदीच्या पात्रातून दिवसाढवळ्या अवैधरीत्या वाळूची सर्रास वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. अवैधरीत्या वाळूची होत असलेल्या वाहतुकी बाबत तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी रामकृष्ण जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तलाठी श्रीमती शिल्पा बोपटे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले मंडळ अधिकारी व कोतवाल दहा मिनिटात घटनास्थळी पोहचतील असे सांगितले. मंडळ अधिकारी व कोतवाल येण्यापूर्वीच तलाठी यांचा झिरो शुभम रावळकर हा त्याठिकाणी पोहचला व वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर चालकास भेटला, कोतवाल घटनास्थळी येण्यापूर्वीच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर मधील वाळूचा कपाशीच्या शेतात उपसा करून पोबारा केला. वाघूर नदीचा उगम हा अजिंठा लेणीतील खडकाळ असलेल्या सप्तकुंडाच्या धबधब्यातून होत असल्याने वाघूर नदीत भरमसाठ वाळू येते. त्यामुळे दिवसाढवळ्या अवैधरीत्या वाळूची सर्रास वाहतूक केली जात असून देखील महसूल झोपेचे सोंग का घेत आहे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र तलाठीचा झिरो हा वसुली करीत असल्याने हिरो झाला आहे. त्यामुळे फर्दापूर तलाठी हद्दीत अवैधरीत्या वाळू व गौनखनिज वाहतुकी विरोधात कार्यवाही झालेली नाही. जिल्हाधिकारी याकडे लक्ष देऊन काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


