आपला जिल्हा

खेजडीच्या झाडांसाठी 363 लोकांच्या बलिदानाच्या वन शहिद दिनी छ.शिवाजी हायस्कूल मध्ये खेजडी चे रोपण करून हरित अभिवादन…

सोयगाव दि.  १३ (प्रतिनिधी) राजस्थान मधील बिष्णोई समाज हा पर्यावरण प्रेमी समाज आहे. सन १७३० मध्ये राजस्थानच्या जोधपूर येथील महाराजा अभय सिंग यांना  नवीन राजमहाल बनवण्यासाठी मोठया प्रमाणात  खेजडी ची लाकडे हवी होती म्हणून त्यांनी महामंत्री भंडारी यांना सैनिकांसोबत खेजाडली या बीस्नोई लोकांच्या गावात पाठविले. त्यांनी झाड कापायला सुरुवात केली तोवर गावातील अमृतादेवी बिष्णोई या महिलेने सैनिकांना झाड तोडू नये म्हणून विरोध केला व झाडास मिठी मारली व अमृतादेवी म्हटल्या की “सिर सांठे, रुख रहे, तो भी सस्तो जान” म्हणजे माझा जीव जाऊन जर झाडे वाचत असतील तर जीव द्यायला मी तयार आहे. यावर त्या सैनिकांनी खेजडीला मिठी मारलेल्या अमृतादेवी यांच्या सह त्यांच्या ३ मुलींची  हत्या केली व संपूर्ण गावाने  झाडांना वाचविण्यासाठी झाडांना मिठी मारून “चिपको आंदोलन” केले व सैनिकांनी त्यांची ही हत्या केली. या खेजडी च्या झाडांसाठी ३६३ लोकांनी बलिदान दिले. ही एक अजरामर घटना या देशात घडली. या वन शहीद दिनाचे स्मरण व पर्यावरण संवर्धन हेतू  सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांच्या हरितवारी या उपक्रमाद्वारे आज शिवाजी हायस्कूल येथे खेजडी म्हणजे शमी या उपयोगी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या निमित्ताने डॉ. पाटील यांनी स्वतः व मित्रांच्या मदतीने ५० शमी ची रोप राज्यात विविध ठिकाणी लावली आहेत. शाळेतील एका मुलीस अमृतादेवींचा राजस्थानी पेहेराव करण्यात येऊन “धरती की बेटी” ही अमृतादेवींच्या जीवनावर आधारित कविता वाचन केले व या अमृतादेवी च्या हस्तेच रोपण करून वृक्ष व वन्यजीव संवर्धनाचा संदेश जगास दिला आहे. डॉ. पाटील यांनी जेव्हा खेजडी बलिदान यावर भाष्य केले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले होते. यावेळी मु. अ. संजीव दौड, रमेश सोनवणे, विष्णू फरकाडे, संगीता तायडे संगीता कृष्णा सपाटे, गणेश चव्हाण, निशांत म्हस्के, गजानन दौड, मधुकर मगर, कृष्णा भांडारे, अमोल ताटू, रमेश परदेशी, संजय पाखरे, पांडुरंग डापके, आदींची उपस्थिती होती.

“खेजडीची महती – खेजडी म्हणजे शमी हा भारतीय वृक्ष असून याच्या पानांना राजस्थान मध्ये उंट, शेळी, हरीण यांना खाऊ घालतात व कोवळ्या पानांची भाजी करतात. या झाडाच्या शेंगांना “सांगरी” म्हणतात व त्या  सुकामेवा प्रमाणे पौष्टीक आहेत व वाळवंटी भागात सुकामेवा म्हणून सेवन करतात. या झाडाचे अनेक उपयोग आहेत व ते भगवान शंकर व विष्णू यांचे प्रिय झाड असल्याने बिष्णोई समाज त्यास पवित्र व देवतुल्य मानतात. याच्या शेंगा खार, माकड, अनेक पक्षी यांना अन्न म्हणून उपयोगी आहे. “एपीस फ्लोरिया” या लहान मधमाश्यांना  उन्हाळ्याच्या शेवटी मध या फुलांतून मिळतो.” डॉ. संतोष पाटील, पर्यावरण संवर्धक, सिल्लोड.

Related Articles

Back to top button