न्यायालयाच्या निर्णयानुसार जंगला शिवारातील गट नंबर १५२ मधून पूर्वपार शेतरस्ता खुला करावा, सोयगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण.
सोयगाव दि. २६ (वृत्तसेवा) जंगलातांडा शिवारातील शेतकऱ्यांनी न्यायालयीन निर्णयानुसार गट क्रमांक १५२ मधून पुर्वपार शेतरस्ता खुला करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून काही आडदांड शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवून ठेवल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जानेवारी २०२० मध्ये न्यायालयाने निकाल देऊन संबंधित रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी संतापले आहेत. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
सोमवारपासून सुरू झालेल्या या उपोषणात संजय शेषमल राठोड, प्रदीप राठोड, ताराचंद राठोड, रोहीदास राठोड, राणीदास राठोड, साईदास राठोड, अनिल राठोड, गजानन राठोड व मुकेश राठोड यांचा समावेश आहे. उपोषणार्थी शेतकरी “न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी व्हावी व रस्ता मोकळा करून द्यावा” या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्याला परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत असून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.



