महाराष्ट्र

रातोरात काळ्या मातीवर केला मुरुमाचा शिडकाव, जनतेचे नोकर असलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी झाले शिरजोर…

पालकवर्ग व ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष...

सोयगाव दि. ०१ (प्रतिनिधी) पालकवर्ग व ग्रामस्थांच्या तक्रारी वरून तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी सोयगाव यांनी सोयगावचे गटविकास अधिकारी यांच्या समवेत दि. १७ सप्टेंबर रोजी आदर्श शाळा बांधकामाची पाहणी करून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड कनिष्ठ अभियंता राजेश राजगुरू यांना अंदाजपत्रक नुसार काम करून घ्या अशा तोंडी सूचना दिल्या यावेळी बेसमेंट मधील काळ्या मातीचा भराव काढून कॉलम ची गुणवत्ता नियंत्रक अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्या नंतर काम सुरू करण्यात येईल असे राजेश राजगुरू यांनी तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी यांच्या समक्ष सांगितले होते. दरम्यान पुन्हा दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री काळी माती बेसमेंट मधून बाहेर न काढताच रातोरात मुरुमाचा बेसमेंट वर शिडकाव करण्यात आला. जनतेचे नोकर असलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी शिरजोर झाल्याने व ठेकेदारास पाठीशी घालीत असल्याने शाळेचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम बिनधास्त सुरू आहे. काळी माती काढून कॉलम ची गुणवत्ता नियंत्रक अधिकारी यांच्याकडून चौकशी केल्या शिवाय काम न करण्याच्या सूचना अभियंता राजेश राजगुरू यांनी ठेकेदारास दिल्या होत्या. मात्र ठेकेदारास सूचना करून देखील ठेकेदार कुणाचेही न ऐकता मनमानी कारभार करीत आहे. यामुळे ठेकेदारास मोठे राजकीय पाठबळ असल्याने कितीही तक्रारी झाल्या तरी देखील ठेकेदाराला वेळोवेळी बिल मिळावे याची दखल अभियंता राजेश राजगुरू घेणार व ठेकेदाराला कामाचे देयक मिळणारच! यामुळे पालकवर्ग व ग्रामस्थांमधून सरकारच्या अनागोंदी कारभारविषयी चीड निर्माण झाली आहे. मात्र गरिबांचे मुलं या शाळेत ज्ञानार्जनासाठी येणार असल्याने निकृष्ठ दर्जाच्या होत असलेल्या इमारतीमुळे त्यांचे जीवन धोक्यात येणार एवढे निश्चित आहे.

“मी मारल्या सारखं करतो, तू रडल्या सारखं कर”

तहसीलदार मनीषा मेने यांनी गटविकास अधिकारी यांच्या समोर तोंडी आदेश देऊनही जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड कनिष्ठ अभियंता राजेश राजगुरू यांनी तहसीलदार यांच्या आदेशाला तिलांजली दिली आहे. ठेकेदारास काम बंद करण्याच्या सूचना राजगुरू यांनी देऊनही चौकशी न करताच ठेकेदार कुणालाही न जुमानता काम सुरू ठेवल्याने अभियंता राजेश राजगुरू व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. तक्रारी असून देखील ठेकेदाराचे देयक कसे अदा केले जाते हा संशोधनाचा विषय असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे. तर अभियंता राजेश राजगुरू ठेकेदारास म्हणत असेल, “मी मारल्या सारखं करतो. तू रडल्या सारखं कर,” याचाच प्रत्यय शाळेच्या बांधकामात दिसून येत आहे.

Related Articles

Back to top button