सोयगाव नगरपंचायतीविरोधात सफाई कामगारांचे अमरण उपोषण कायम.
उपोषणाचा आज तिसरा दिवस – प्रशासनाकडून कोणतीही दखल नाही.

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) नगरपंचायतीच्या निष्क्रीय कारभाराविरोधात शहरातील सफाई कामगारांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अमरण उपोषणास सुरुवात केली असून आज या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू आहे. मुसळधार पावसातही सफाई कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत; मात्र नगरपंचायतीकडून किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही सकारात्मक उत्तर देण्यात आलेले नाही.
शहरातील स्वच्छतेचे काम जय दुर्गा इंटरप्रायजेस या कंपनीकडे दिले असून, नगरपंचायत दरमहा तब्बल सहा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये ठेकेदाराला अदा करते. मात्र प्रत्यक्षात कामगारांना अत्यल्प मानधन देण्यात येत असल्याची कामगारांची तक्रार आहे. महिलांना केवळ १५० रुपये तर पुरुषांना २०० रुपये इतकेच मजुरी दिली जाते. शिवाय कामगारांना पीएफ, आरोग्य सुविधा, किमान वेतन व शासकीय योजनांचा लाभही मिळत नसल्याचे समोर आले आहे.
सफाई कामगारांच्या मते, या संदर्भात वारंवार पगारवाढीसाठी मागणी करण्यात आली. परंतु ठेकेदार व सत्ताधाऱ्यांकडून दादागिरी केली जाते. महिलांना व पुरुषांना घरी बसविण्याच्या धमक्या देण्यात येतात. यामध्ये खरा ठेकेदार कोण आहे हे स्पष्टपणे सांगितले जात नाही, त्यामुळे कामगार असमंजसतेत सापडले आहेत.
सोयगाव नगरपंचायतीवर सध्या शिंदे गट शिवसेनेचे एकहाती वर्चस्व असून, आमदार अब्दुल सत्तार यांच्या दबावशाहीमुळे कामगारांना न्याय मिळत नसल्याचा आरोप होत आहे. शहरात सध्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
यापूर्वी १५ ऑगस्ट रोजीही सफाई कामगारांनी उपोषण केले होते. त्यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी संभाजी देशमुख, अभिजीत सहाणे, स्वप्नील सुईटे, दिनेश हिवराळे व राजेश मानकर यांनी कामगारांना आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. परंतु आश्वासनांची पूर्तता न झाल्याने १७ सप्टेंबर “मुक्ती संग्राम दिना” पासून पुन्हा एकदा सफाई कामगारांनी अमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाचा आज तिसरा दिवस असूनही ना मुख्याधिकारी, ना इतर अधिकारी उपोषण स्थळी हजर झाले. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जोपर्यंत आमच्या मागण्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील,” असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे



