आपला जिल्हामहाराष्ट्र

बनोटी वनपरिमंडळात सर्रास अवैधरीत्या वृक्षांची तोड, माहिती देऊनही वनविभागाची कार्यवाही करण्यास टाळाटाळ, रक्षकच भक्षक….

सोयगाव दि. ०२ (वृत्तसेवा) सोयगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बनोटी वनपरिमंडळात भरदिवसा सर्रास अवैधरीत्या डेरेदार वृक्षांची तोड केली जात आहे. ट्रॅक्टर द्वारे लाकडांची वाहतूक केली जात असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे वनपरिमंडळ अधिकारी यांना तर व्हाट्सएपद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांना दि. २८ बुधवारी माहिती देऊनही चार पाच दिवसांचा कालावधी लोटला अद्यापही कार्यवाही करण्यात आली नसल्याने रक्षकच भक्षक असल्याची चर्चा सद्या तालुक्यात रंगली आहे. कार्यवाही होत नसल्याने वृक्षतोडीचे प्रमाण वाढत चालले असून वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव – बनोटी रस्त्यावरील वरठाण गावाजवळ मोठमोठे डेरेदार वृक्षांची अवैधरीत्या तोड करून ठेवलेली लाकडे दि. २८ बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वाहतूक करण्यासाठी कुणाचेही भय नाही अशा बिनधास्तपणे ट्रॅक्टर मध्ये भरली जात होती. याबाबत वनपरिमंडळाचे अधिकारी अली यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. घटनास्थळी पोहचण्यासाठी अर्धा एक तास लागेल असे त्यांनी सांगितले. तो पर्यंत ट्रॅक्टर लाकडे भरून निघून जाणार होते. एक ते दीड किलोमीटर अंतरावर वनपरिमंडळाचे कार्यालय असून देखील घटनास्थळी पोहचण्यासाठी एकही कर्मचारी कार्यालयात नाही. यामुळे आर्थिक हितसंबंधातून हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अली यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त अवैध वृक्ष तोडीचे प्रमाण वाढले आहे. कुणाकडेही तक्रार करा कार्यवाही तर दूरच जो पर्यंत ट्रॅक्टर लाकडे भरून हद्दीतून मार्गस्थ होत नाही तो पर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी अली यांच्या दहशतीमुळे कार्यवाही करण्यास धजावत नाही. स्थानिक पासून ते जिल्हा कार्यालयापर्यंत हितसंबंध जोपासले जात असल्याने लाकूड तस्करांवर कार्यवाही केली जात नाही. त्यामुळेच बनोटी वनपरिमंडळ परिसरात अवैध वृक्षांची तोड केली जात आहे. याप्रकरणी राज्यपाल, मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले.

पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी विविध क्षेत्रात काम करणारे प्रतिष्ठित, राज्यकर्ते यांच्याकडून वेळोवेळी वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात येते. जनजागृती साठी शालेय विद्यार्थ्यांची शहरात, गावात वृक्षदिंडी काढली जाते. यातून बहुतेक ठिकाणी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते वृक्षारोपण करीत आहे. मात्र रक्षक असलेला सोयगाव वनविभागच भक्षकाची भूमिका बजावत असल्याने आणखी किती डेरेदार वृक्षांचा बळी जाणार हे मात्र अनुत्तरित आहे.

Related Articles

Back to top button