सिल्लोड – सोयगाव येथील आंदोलनकर्त्यांचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप, विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन…

मुबंई दि. १२ (वृत्तसेवा) सिल्लोड-सोयगाव मतदार संघाचे आमदार तथा अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या विविध भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार प्रकरणांमध्ये सिल्लोड तालुक्यातील जवळपास ६० ते ७० आंदोलनकर्त्यांनी दि. १२ शुक्रवारी विधान भवन मुंबई येथे आक्रमक आंदोलन केले. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अब्दुल सत्तार यांची रजाकारी, हुकुमशाही व मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी आंदोलनात केला. मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या परिवाराने गोरगरीब लोकांच्या मालमत्ता प्लॉट जमिनी बळकवल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला. सिल्लोड येथील सर्वे नंबर ९१, ९२ मधील बोगस हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज याच्यावर तात्काळ कारवाई करावी. ईडी, सीबीआय व सीआयडी कार्यालयात दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. गोरगरीब लोकांच्या बळकावलेल्या मालमत्ता, प्लॉट, जमिनी त्यांना परत मिळवून द्यावे. आंदोलनकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा देत विधान भवन परिसर दणाणून सोडले होते. अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करा अथवा सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील सातबारा अब्दुल सत्तार यांच्या नावावर करा, सिल्लोड तालुक्यात रजाकरी व हुकुमशाही घोषित करा, सिल्लोड – सोयगाव तालुक्यात देशातील कायदे लागू होणार नाहीत असे जाहीर करा, अशी अजब मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले होते. सिल्लोड तालुक्यातील सुनिल मिरकर, मनोज मोरेल्लु, विष्णू गं. काटकर, महेश शंकरलाल शंकरपेल्ली, शेख अमान, गजानन गोराडे, भगवान जीव्रग, शेख रफिक, शकील पठाण, अश्फाक पठाण, समीर शेख, अन्वर पटेल, कासम अजमेर खा, अरमान खा, साहिल पठाण, देवीलाल दुधे, धनसिंग दूधे, संपत हासे, गणपत फासे, जगन हासे, योगेश लोंधे, संजय लोंधे आंदोलनात सहभागी झाले होते.



