सोयगाव परिसरात बुचडा गँग सक्रिय – सोने उजळून देतो सांगून करताय वृद्धांची फसवणूक – पोलीस अलर्ट –

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) सोयगाव परिसरातील ग्रामीण भागात तीन दिवसांपासून सोने उजळून देतो असे सांगून घरातील वृद्ध नागरिक ब महिलांची फसवणूक सुरू असल्याचे प्रकार रविवारी उघडकीस आले यामुळे सोयगाव परिसरात पोलीस अलर्ट झाले असून डोक्याच्या केसांचा बुचडा बांधून ही गँग ग्रामीण भागात दुपारी फिरत आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन करून याबाबत अनोळखी संशयित गावात आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी केले आहे.
दरम्यान शुक्रवारी सोयगाव परिसरातील निंबायती, बहुलखेडा, निमखेडी, उमरविहिरे आदी भागात डोक्याच्या केसांचा बुचडा बांधून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदर बुचडा गँग मधील अनोळखी हे ग्रामीण भागात जाऊन सोने उजळून देतो असे सांगून महिलांना दागिने दाखवा असे सांगतात व सोने घेवुन पोबारा करतात असे प्रकार ग्रामीण भागात घडत आहे. याप्रकरणी सोयगाव पोलिसांचे एक पथक उपनिरीक्षक गणेश झलवार, जमादार राजू बर्डे, रविंद्र तायडे, अजय कोळी आदींचे विशेष पथक तैनात करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस असल्याचीही बतावणी –
दरम्यान तोतया पोलीस असल्याचेही सांगून एक टोळी दागिने हिसकावून घेत आहे. तर तुमचे घरकुल मंजूर आहे. त्यासाठी पाहणी करायची आहे, असे सांगून घरातील एकट्या महिला पाहून दागिने काढून ठेवा असे सांगून दागिने लांबवून महिलांना गंडा घालत आहे. त्यामुळे पोलिसांनी सोयगाव शहरात जनजागृती सुरू केली आहे. ग्रामीण भागात दवंडी द्वारे जनजागृती हाती घेण्यात आली आहे.
ग्रामीण भागात देण्यात येणारी दवंडी –
सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की आप आपल्या गावामध्ये फेरीवाले हे लकी ड्रॉ. काढून साहित्य देतात व फसवणूक केली जाते, तसेच वयोवृद्ध माणसे घरी बघून त्यांना सोने उजळून देतो असे आमिष दाखवून फसवणूक करतात, गावामध्ये प्रकार घडत असून, आपण सर्व नागरिकांनी जागरूक रहावे तसेच वरील फसवणूक करणारे इसम आढळून आल्यास गावातील पोलीस पाटील किंवा पोलीस ठाणे सोयगाव यांचाशी संपर्क त्वरित करावा. असे दवंडी देऊन जनजागृती करत असल्याचे उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी सांगितले आहे अद्याप एकही तक्रार आलेली नसुन तक्रार आल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी सांगितले.



