प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासमोरच ड्रायव्हिंग स्कुलची गाडी रस्त्यात उभी, वाहतुकीची कोंडी….

सोयगाव दि. २३ (प्रतिनिधी संदीप इंगळे) सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह येथे दि. २३ मंगळवारी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ड्रायव्हिंग स्कुलच्या चालकाने मनमानी करीत रस्त्यात एक तास ते दिड तासभर वाहन उभे केल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. यामुळे दुचाकीस्वार बाजारात माल विक्रीसाठी आणणारे चारचाकी वाहनधारक, महिला व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आठवड्याच्या दर मंगळवारी पंचायत समितीच्या प्रांगणात आठवडा बाजार भरत असतो. पंचायत समितीच्या इमारतीची काम चालू असल्याने पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह समोरील इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह येथे कॅम्पचे आयोजन करण्यात होते. दरम्यान पंचायत समिती कार्यालय व आठवडा बाजारात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. याच रस्त्यावर ड्रायव्हिंग स्कुलच्या चालकाने मनमानी करीत वाहन रस्त्यात उभे केल्याने बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी दुचाकीवर शेतकरी भाजीपाल्याचे कॅरेट घेऊन येत असतात तर काही शेतकरी, छोटे व्यापारी चारचाकी वाहनाने बाजारात विक्रीसाठी माल घेऊन येत असतात. ड्रायव्हिंग स्कुलचे वाहन रस्त्यातच एक ते दिड तास उभे होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नागरिकांना परवाना देण्यासाठी त्यांची वाहन चालविणाची चाचणी घेत होते. त्यांच्याच बाजूला ड्रायव्हिंग स्कुलचे वाहन रस्त्यात उभे होते मात्र अधिकाऱ्यांनी त्या ड्रायव्हिंग स्कुलच्या चालक, मालकास वाहन बाजूला करण्याचे सांगण्याची तसदीही घेतली नाही व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बाजारात येणाऱ्या वाहनचालक व नागरिकांना त्या वाहनांमुळे मोठा त्रास सहन करावा लागला होता. तर चारचाकी वाहनधारकास आपले वाहन परत घेऊन जावे लागले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या या वागणुकीची उलटसुलट चर्चा शहरात रंगली होती. तर सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असेही काही नागरिकांमधून बोलले जात होते.



