अवैधरित्या देशीदारू वाहतूक, तिघांवर गुन्हा दाखल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर्थिक दुर्लक्ष…
देशीदारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर सोयगाव पोलिसांची कारवाई,

सोयगाव दि. ८ (वृत्तसेवा) निंबायती, बहुलखेडा जरंडी गावासह सोयगाव – बनोटी रस्त्यावर असलेल्या ढाब्यांवर अवैधरित्या देशी, विदेशी दारूची सर्रास विक्री केली जात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष केल्याने सोयगाव-बनोटी रस्त्यालगत ढाब्याची संख्या वाढत आहे. दरम्यान देशीदारूची अवैधरित्या विक्री करण्यासाठी दोन इसम मोटार सायकलवर सोयगाव येथून देशीदारूची खोके जरंडी कडे घेऊन जाणार असल्याची दि. २३ जानेवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सोयगाव-जरंडी रस्त्यावरील गवळणी नाला येथे सोयगाव पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी बिट जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे यांना सोबत घेऊन सकाळी नऊ वाजता सापळा रचून मोटार सायकलवर असलेल्या दोन इसमान थांबविले असता मोटार सायकलवर मागे बसलेल्या इसम जवळ असलेली पांढऱ्या रंगाच्या गोणी घेऊन मोटार सायकलवरून खाली उतरताच दुसरा इसम मोटार सायकल क्रमांक एम. एच. २० इ. एन. ७०६७ ही घेऊन पळून गेला. पकडलेल्या इसमाजवळ चार खाकी रंगाचे खोके आढळून आले त्यात देशीदारू सकू संत्रा टंगो प्रीमियमच्या १८० एम. एल. च्या १९२ सीलबंद काचेच्या बाटल्या अंदाजी किंमत १९२००/₹ तर एका खोक्यात ३६००/₹ किंमतीच्या टुबर्ग प्रीमियम स्ट्रॉंग च्या ६५० एम. एल. काचेच्या बारा बाटल्या आढळून आल्याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक गणेश झलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप जैस्वाल (पूर्ण नाव माहीत नाही), सह अन्य दोन इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ नुसार कलम ६५ (ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोयगाव तालुक्यात ढाब्यावर अवैधरित्या देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री केली जात असून राज्य उत्पादन शुल्क विभाग आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष करीत असल्याने अवैधरित्या देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे तरुण पिढीचे भवितव्य अंधारमय होत असून अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून काही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
सोयगाव पोलीस ठाण्याअंतर्गत सोयगाव, आमखेडा, बनोटी व गोंदेगाव या ठिकाणी देशी दारूचे परवाना धारक दुकाने आहेत. त्यातील सोयगाव व आमखेडा येथील देशीदारू दुकान येथून जरंडी, सावरखेडा, सिल्लोड तालुक्यातील हळदा, डकला, वसई जळकी व लेनापूर येथे मोटार सायकलवर अवैधरित्या देशीदारूचा पुरवठा केला जात आहे. तर गोंदेगाव येथील देशीदारू दुकान येथून निंभोरा, बहुलखेडा, निंबायती जरंडी याठिकाणी अवैधरित्या देशीदारूची वाहतूक केली जात आहे. गावात व ढाब्यावर चढ्या भावाने सर्रास देशी विदेशी दारूची विक्री केली जात असून यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे तरुणांचे संसार उध्वस्त.
निंबायती, माळेगाव – पिंप्री, कवली, बहुलखेडा, तिखी फाटा, उमरविहीरे, घोसला, सातगाव फाटा, सह परिसरात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी, गावराण दारू विक्री होत आहे. तालुक्यातील ढाबेच दारू विक्रीचे अड्डे बनले आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार देखील उघडण्यावर पडत आहे. तरी यावर कोण कारवाई करणार हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.


