मुख्यमंत्री भाऊ एसी गाडीत, बहिणींचा मुलाबाळांसह परिवहन महामंडळाच्या बसगाड्या मधून जीवघेणा प्रवास..

सोयगाव दि. ०६ (वृत्तसेवा) ऐन दिवाळी व भाऊबीजेच्या सणानिमित्त माहेरी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना मुलाबाळांसह परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.चालकाच्या कॅबिन मध्ये प्रवाशी बसवून वाहतूक केली जात आहे.यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.मात्र लाडक्या बहिणींचा मुख्यमंत्री असलेला लाडका भाऊ एसी गाडीत फिरत आहे.परिवहन महामंडळाकडून पुरेशी प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जात नसल्याने लाडक्या बहिणींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ऐन दिवाळी व भाऊबीजेच्या सणानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी मुलाबाळांसह माहेरी जात असल्याने बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.महिलांना परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये प्रवासी भाड्यात पन्नास टक्के सूट दिल्याने लाडक्या बहिणींना बसस्थानकावर बसची वाट पहावी लागत आहे. आर्थिक भुदंड सोसावा लागू नये याकरिता बसने प्रवास करण्याकडे बहिणींचा कल जास्त आहे.ग्रामीण भागात परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची कमतरता जाणवत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना देण्यात आलेल्या प्रवासी वाहतूक परवान्याच्या दुप्पट प्रवाशी वाहतूक केली जात असल्याने लाडक्या बहिणींना व त्यांच्या मुलाबाळांना गर्दीत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक केली जात आहे. मात्र प्रादेशिक परिवहन विभाग कार्यवाही करण्यास धजावत नसल्याने राज्यात कायदा,लोकशाही जिवंत आहे किंवा नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करून गोरगरीब नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे हा खेळ कोण थांबवणार हे मात्र अनुत्तरित आहे.


