महाराष्ट्र

कन्नड – सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत; ढगफुटीग्रस्त गावांसाठी विशेष पॅकेजची मागणी. :- आ. संजानाताई जाधव.

सोयगाव दि. १८ (वृत्तसेवा) कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. शेतजमिनी खरडून वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नुकतेच चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना आ. संजनाताई जाधव यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल. तसेच हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करून शेतकऱ्यांना अधिक मदत मिळेल.”

आ. संजनाताई जाधव यांनी गुरुवारी निमखेडी व घोसला येथे पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुका प्रशासनाला तातडीने तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. “पंचनामे होताच निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील घोसला, नांदगाव तांडा, निमखेडी, तिडका आदी सहा गावांची पाहणी करून येथील गंभीर नुकसानाचे चित्र त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. ढगफुटीमुळे शेतीची जमीन वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विशेष पॅकेजची मागणी करण्यात आली असून हिवाळी अधिवेशनात ते मंजूर करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने रक्कम वितरित करण्यात येईल, असेही आ. संजनाताई जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button