निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरीत सत्तारांनी ढकलले, सोयगावातील प्रकार–

सोयगाव दि. १२ (वृत्तसेवा) सिल्लोड – सोयगाव चे लोकप्रतिनिधी, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार हे दि. ११ शुक्रवारी विविध कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना शहरातील मरीआई मंदिराजवळ असलेल्या स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यासाठी आले असता आमखेडा – मेणगाव निकृष्ठ झालेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी सत्तारांना केली होती. त्यावेळी सत्तारांनी शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले हे काम मीच केले आहे. तुम्हाला कोणीही विचारत नव्हते असे म्हणत शेतकऱ्यांना ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार दि. ११ शुक्रवारी शहरात घडल्याने शेतकऱ्यांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, ना. अब्दुल सत्तार हे दि. ११ शुक्रवारी सोयगाव तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन करण्यासाठी सोयगाव दौऱ्यावर होते. यावेळी शहरातील मरीआई मंदिराजवळील स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यासाठी आले असता त्याठिकाणी शेतकऱ्यांनी आमखेडा – मेणगाव या रस्त्याच्या निकृष्ठ झालेल्या कामाची पाहणी करावी अशी विनंती केली. मात्र हे काम मीच केले आहे तुम्हाला कुणीही विचारत नव्हते असे म्हणत अरेरावी करीत शेतकऱ्यांना ढकलून देत निघून गेले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी सत्तारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. रस्त्याचे व पुलाचे काम हे चार पाच महिन्यांपूर्वी झाले मात्र पुलाची व रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सदरील रस्ताच पाण्याने पूर्ण पणे वाहून गेला आहे. तसेच पुलाच्या जवळच भला मोठा खड्डा पडला असल्याने आज रोजी शेतकऱ्यांना मोठ्या कसरतीने शेत मालाची वाहतूक करावी लागत आहे. सदरील काम सत्तारांच्या जवायाने केले आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून त्यामुळे अधिकारी चौकशी करण्याची हिम्मत करीत नसल्याने तालुक्यात निकृष्ठ कामे होत आहे. पावसामुळे झालेले नुकसान त्यात मालाला भाव नाही, रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. विकासाच्या नावावर शासनाच्या पैशांची ठेकेदार, अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांनी चालवलेली लुटीमुळे तालुक्यात सुरू असलेले रस्त्यांची कामे, इमारती कामे निकृष्ठ दर्जाची केली जात आहे. तक्रारी करून देखील कार्यवाही होत नसल्याने विकासाच्या नावाखाली लोकनेत्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांना तुच्छ समजणाऱ्या ना अब्दुल सत्तारांचा अशोक बोर्डे, राजू चौधरी, प्रकाश तेलंगरे, कैलास पंडित, अशोक चौधरी, पिंटू फुसे, संदीप तेलंगरे, राजू आगे, प्रकाश बोडखे, शांताराम आगे, रामदास पवार, विष्णू गव्हाड, दत्तू नागपुरे, सोनाजी मिसाळ व पप्पू पठाडे आदीं शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.
मे. लिमरा इन्फ्रा प्रोजेक्ट्स छत्रपती संभाजीनगर ही कंपनी सत्तारांच्या जवायाची असल्याचे आमखेडा व सोयगाव येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आमखेडा – मेणगाव हा रस्ता व पूल कामासाठी ३० लक्ष रुपये मंजूर झाले होते. काम सत्तारांच्या जवायाने घेतले असल्याने अभियंता होत असलेल्या कामाची पाहणी न करताच बिले काढण्यासाठी ठेकेदारास मदत करतो त्यामुळेच चार पाच महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याची बिकट दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांना शेतीचा पिकलेला माल ने – आण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या कामाची चौकशी करून मे. लिमरा इन्फ्रा प्रोजेक्ट्स ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.



