महाराष्ट्रराजकीय

आनंदाचा शिधा रेशनिंग दुकानात पोहोचला, ना. अब्दुल सत्तार यांनी केला अट्टाहास.

व्हायरल मॅसेजमुळे लाभार्थी वेठीस...

सोयगाव दि. २८ (वृत्तसेवा) राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत गौरी गणपती गणेशचतुर्थीच्या दिवशी शिधा वाटप करण्याची घोषणा केली. वृत्तपत्रांमध्ये अगदी पानभर त्याची जाहीरात करण्यात आली. सोयगाव पुरवठा विभागाकडून पंचवीस हजार शिधा किटची मागणी करण्यात आली होती. त्यात तेवीस हजार दोनशे सोळा किट उपलब्ध झाले. दोन हजार लाभार्थ्यांना शिधाकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान रॉशेन दुकानदारांच्या व्हाट्सएप ग्रुपवर दि. २७/०९/२०२४ वार शुक्रवार रोजी मा. ना. अब्दुलजी सत्तार साहेब (अल्पसंख्यांक व पणन मंत्री) तथा पालकमंत्री यांचा सोयगाव तालुक्यात दौरा असून खालील रास्त भाव दुकाने यांनी अभिलेख अद्यावत करून ठेवावे. तसेच शिधासंच पिशवी मध्ये टाकून तयार ठेवावे. मा. पालकमंत्री यांच्या हस्ते शिधा संच वाटप करण्यात येणार असल्याचा मॅसेज फिरल्याने रॉशेन दुकानदार अडचणीत आले होते. सकाळी रॉशेन दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आला होता. सकाळ पासूनच लाभार्थी रांगेत उभे होते. मात्र ना. सत्तार फिरकलेच नाही. नामदारांच्या अट्टाहासामुळे लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. नामदारांचा मुलगा समीर यांच्याहस्ते किट देण्यात आले. जनतेच्या नाराजीचा अंदाज आला असल्याने ना. सत्तार यांच्याकडून जनतेस वेठीस धरले जात असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, गौरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशचतुर्थीच्या दिवशी शिधा वाटप करण्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर सोयगाव पुरवठा विभागाच्या गोडावून मध्ये  दि. ०९ ते १८ दरम्यान पूर्ण किटचा सामान दाखल झाला होता. रॉशेन दुकानदारांना दि.२२ पर्यंत शिधा किट वाटप करण्यात आले. दरम्यान रॉशेन दुकानदारांच्या ग्रुपवर ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दि. २७ रोजी शिधा किट वाटप केले जाणार असल्याचा मॅसेज व्हायरल करण्यात आला. धाका मुळे रॉशेन दुकानदारांनी लाभार्थ्यांना शिधा वाटप केला नाही. अगोदरच शिधा वाटपास उशीर झाला होता. नामदारांच्या अट्टाहासामुळे पुन्हा शिधा वाटप लांबणीवर पडले. नामदार दि. २७ शुक्रवार रोजी पासुन शिधा वाटप करण्यात येणार असल्याच्या मॅसेज मुळे रॉशेन दुकानदारांनी रॉशेन दुकानाच्या बाहेर मंडप टाकला होता. सकाळ पासूनच लाभार्थी शिधा घेण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी दिव्यांग, वयोवृद्ध व महिला रॉशेन दुकानाच्या बाहेर रांगेत उभ्या होत्या यावेळी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. ना. सत्तार आलेच नाही मात्र त्यांचे चिरंजीव समीर यांच्याहस्ते शिधा किट वाटप करण्यात आले. रॉशेन दुकानदाराने १०० रु घेऊन लाभार्थ्यास शिधा किट द्यावे असे असताना दुकानदार १०० रु. न घेताच मोफत शिधा वाटप करत असल्याने लाभार्थ्यांचे पैसे रॉशेन दुकानदारांना कोण देणार याबाबत उलट सुलट चर्चा रंगली होती. दरम्यान शिधा किट घेऊन परतणाऱ्या लाडक्या बहिणींनी मात्र शिव्यांची लाखोली वाहत, आमचा पण दिवस येईल असा वार्तालाप करत घराचा रस्ता धरला होता.

ना. सत्तार यांनी रेशनच्या प्रत्येक दुकानात एक एक कार्यकर्ता बसवून प्रत्येक लाभार्थ्याचे नाव व मोबाईल नंबर घेण्यात येत होते. त्यामुळे काही दिवसात मोबाईल व नाव घेतलेल्या लाभार्थ्यांचे नाव तर मतदार यादीतून काढून टाकले जाणार नाही ना? अशी उलटसुलट चर्चा शहरात ऐकावयास मिळत आहे. कारण ना. सत्तारांच्या सोयगाव येथील नॅशनल हायस्कुलचा लिपिक याने काही दिवसांपूर्वी तहसिल कार्यालयात निवडणूक विभागाच्या संगणकाचा ताबा घेऊन तहसिल मधील व्यक्तीने त्या लिपिकास पासवर्ड व ओटीपी दिला होता त्या संगणकावर लिपिकाने काम केले होते. मात्र अद्यापही तहसीलदार मनीषा मेने यांनी ना. अब्दुल सत्तार यांच्या दबावाला बळी पडत कार्यवाही केलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

रॉशेन दुकानावर अतिरिक्त व्यक्ती नाव व मो.नंबर लिहिल्या नंतरच रॉशेन दुकानदार १०० रु. न घेताच लाभार्थ्यास शिधाकीट मोफत देत होते. हा प्रकार  सिल्लोड – सोयगाव मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सोयगाव तालुक्यातील गावात सुरू होता. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. रॉशेन दुकानावर अतिरिक्त बसलेल्या व्यक्ती बाबत रॉशेन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता याबाबत पुरवठा विभागाकडून कोणताही आदेश आला नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Related Articles

Back to top button