सोयगाव चा आठवडी बाजार चिखलात, बाजार भाडे वसुली सक्तीने…
बाजारात दुकान थाटणाऱ्या व्यापाऱ्यांना सुविधा देण्यास नगरपंचायत अपयशी... पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष...

सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा) मंगळवार हा सोयगावचा आठवडी बाजाराचा दिवस असून आठवडी बाजार चिखलात भरत असल्याने विक्रेते, व्यापारी व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नामदार सत्तारांच्या ताब्यात असलेल्या या नगरपंचायत विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दुकानदारांकडून भाडे वसूल करण्यासाठी नगरपंचायत ने ठेका दिला आहे. ठेकेदार विक्रेते व व्यापारी यांच्याकडून दर मंगळवारी भाडे वसूल करण्यासाठी सोयगाव येथे येत असतो. मात्र विक्रेते व व्यापारी यांना नगरपंचायत व ठेकेदाराकडून कोणतीही सुविधा पुरविण्यात येत नाही. चिखलातच आपली दुकाने थाटावी लागतात. मोकाट जनावरांपासून स्वतःच आपल्या मालाचे व स्वतःचे रक्षण करावे लागते. भाजीपाल्यावर पाणी शिंपण्यासाठी पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. याबाबत अनेक तक्रारी करून देखील मुख्याधिकारी राजकीय दबावामुळे कारवाई करीत तर नाहीच मात्र तक्रार करण्याऱ्यासच अनेक संकटाना सामोरे जावे लागते.
बाहेर गाव येथून व्यवसायासाठी येणाऱ्या छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव या हुकूमशाही ला सामोरे जावे लागते. बाजारासाठी नगरपंचायत कडे स्वतःची जागा नसल्याने बाजार पंचायत समितीच्या मैदानात भरविला जातो. मात्र वसुली नगरपंचायत करीत आहे. पंचायत समितीने नगरपंचायत ला इतर ठिकाणी बाजार स्थलांतरित करावा यासंबधी पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र तो कागदावरच आहे. राजकीय दबावामुळे तो पुढं सरकतच नसल्याने नगरपंचायत कार्यालय हुकूमशाही पध्दतीने कारभार करीत असल्याची भावना स्थानकांमध्ये निर्माण झाली आहे. सोयगावच्या आठवडी बाजारावर आजूबाजूचे खेडे अवलंबुन असल्याने मंगळवारी शहरात गर्दी होत असते. यामुळे आर्थिक उलाढाल होत असते. नगरपंचायतने शहर व परिसरातील सर्व नागरिकांची आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून व्यापाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था करून देण्याची मागणी व्यापारी व नागरिकांमधून होत आहे. या संदर्भात लवकरच पालकमंत्री व जिल्हा अधिकारी यांच्या कडे लेखी मागणीचे निवेदन देणार असल्याचे व्यापारी बंधूनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

सोयगाव बाजार परिसरात मोकाट गुराचा सुळसुळाटामुळे लहान मुलं, महिला व वयोवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायत कडून या मोकाट जनावरांचा अद्यापही बंदोबस्त करण्यात आला नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोकाट गुरांच्या कळपांना बाजारात जाऊ नये यासाठी नगरपंचायत कोणतीही उपाययोजना करीत नाही. अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार करून देखील नगरपंचायत कारवाई करीत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.



