महाराष्ट्र

बसपच्या राष्ट्रीय बैठकीत “ऑपरेशन सिंदूर” ला समर्थन.

संघटन बळकटीवर बैठकीत विचारमंथन.

मा. आकाश आनंद यांच्याकडे मुख्य राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी.

पुणे दि. २० (वृत्तसेवा) बहुजन समाज पक्षाची राष्ट्रीय बैठक नुकतीच दिल्ली येथील केन्द्रीय कार्यालयात पार पडली.बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा,उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व माजी खासदार आदरणीय सुश्री बहन मायावती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशभरातून आलेले वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षाच्या कार्यमूल्य दृष्टिकोनातून विचारमंथन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (दि. १९) दिली. विशेष म्हणजे बैठकीतून पक्षाचे युवा नेते, मा. आकाश आनंद यांच्याकडे मुख्य राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे डॉ. चलवादी म्हणाले.

बैठकीत सर्वप्रथम दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीर मध्ये घडलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. बैठकीतून भारतीय सेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या जोरदार आणि यशस्वी कारवाईचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. सुश्री बहन मायावती जी यांनी भारतीय सेनेच्या या कारवाईस ‘गौरवशाली आणि प्रेरणादायी’ असे संबोधले. पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला झुकून न जाता भारताने दाखवलेला निर्धार आणि सजगता अतिशय स्तुत्य आहे, अशा शब्दात त्यांनी देशाकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तराचे समर्थन केले.

देशहित, जनहिताच्या दृष्टीने दहशतवादविरोधी उपायही सातत्याने आणि कठोरपणे राबवणे आवश्यक आहे, जेणेकरून शहीदांच्या पत्नींच्या कुंकवाला (सिंदूर) गमवावे लागू नये. तसेच काश्मीरप्रश्नी अमेरिका किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपास स्पष्टपणे नकार देणे आणि या राष्ट्रीय सहमतीवर ठाम राहणे ही देशासाठी हितावह बाब असल्याचे सुश्री बहन मायावती यांनी अधोरेखित केल्याचे डॉ. चलवादी म्हणाले.
या बैठकीत देशातील विविध भागांमध्ये महापुरुष – तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवर झालेल्या अनादराच्या घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला. अशा घटनांमुळे समाजात विषमता, द्वेष आणि तणाव वाढतो, त्यामुळे संबंधित राज्य सरकारांनी अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत मा. बहनजी यांनी व्यक्त केले. मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ मंत्र्याने महिला सैन्य अधिकाऱ्यांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा आणि समाजवादी पक्षाच्या नेत्याने सैन्यदलास जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अशा संकुचित आणि विघातक मानसिकतेच्या विरोधात कायदेशीर आणि राजकीय पातळीवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी बैठकीतून करण्यात आली.

बैठकीत देशातील महागाई, गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक अन्याय या मुद्द्यांवरही चर्चा झाली.हे सर्व प्रश्न दहशतवादामुळे आणि अस्थिरतेमुळे अधिक तीव्र झाले असून, केंद्र सरकारने देशातील संसाधने या समस्यांच्या समाधानासाठी केंद्रित करणे आवश्यक आहे, असे मत बहनजीं नी व्यक्त केल्याचे डॉ. चलवादी म्हणाले.
पक्षाच्या कार्यप्रणालीस अधिक शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच बहुजन वॉलंटियर फोर्स ( बी. व्ही. एफ. ) या गणवेशधारी संघटनेला पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला. या फोर्सचा वापर देशभरात पक्षाच्या कार्यक्रमांत सुरळीतता आणि अनुशासन राखण्यासाठी होणार आहे.
या बैठकीत दि. २ मार्च २०२५ रोजी दिलेल्या सूचनांनुसार, राज्य आणि जिल्हा स्तरावरील समित्यांच्या पुनर्रचनेचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी अंमलबजावणीत त्रुटी आढळल्या, त्यास तातडीने दूर करण्याचे आदेश पक्षाध्यक्षांनी दिले. तसेच, दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये बी.एस.पी. प्रतिनिधीमंडळांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन कायदेशीर आणि शांततामय मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीत बिहार विधानसभा निवडणुकीवरही विशेष चर्चा झाली. यावेळी पक्षाने जाहीर केले की, येत्या वर्षअखेरीस होणाऱ्या बिहार निवडणुकीत बी.एस.पी. कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करता, स्वतंत्रपणे लढणार आहे.
बैठकीचा सर्वात महत्त्वाचा ठराव म्हणजे, संपूर्ण देशभरातील पदाधिकाऱ्यांच्या एकमताने श्री आकाश आनंद यांची मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर पक्षाचे पुढील कार्यक्रम आणि संघटन विस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुश्री मायावती यांनी विश्वास व्यक्त केला की, आकाश आनंद हे संयम, शिस्त आणि कार्यक्षमता यांचे भान ठेवून पक्ष व चळवळीच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.
बी. एस. पी. च्या या बैठकीने पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी ठोस दिशा आणि नवचैतन्य प्रदान केले असून, संघटनेच्या बळकटीकरणासाठी देशभरात नव्या उमेदीने काम सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याचे डॉ. चलवादी म्हणाले.

Related Articles

Back to top button