महाराष्ट्रराजकीय

दुष्काळाच्या सावटात नामदारांचे अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात साजरा, तालुका प्रशासन दिमतीला.

ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना मनस्ताप...

सोयगाव दि. ०२ (वृत्तसेवा) तालुक्यावर दुष्काळाचे सावट असताना देखील राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचा अभिष्टचिंतन सोहळा सोयगाव येथे दि. २ मंगळवारी फटाक्यांची आतिषबाजी करीत लाडू तुला करून जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रशासनातील अधिकारी दिमतीला असल्याने ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांना अधिकारीच कार्यालयात उपस्थित नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राज्याचे पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा दि. १ जानेवारी सोमवारी अभिष्टचिंतन असल्याने दि. ३१ डिसेंम्बर पासूनच शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी अभिष्टचिंतनाचे बॅनर लावण्यात आले होते. अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून सोयगाव येथील शिवसेना भवनात दि. २ मंगळवारी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुका प्रशासनातील अधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामासाठी सोयगाव येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना शोधत होते मात्र अधिकाऱयांची खुर्ची रिकामी असल्याने आर्थिक भुदंड सोसत रिकाम्या हाती नागरिकांना घरी परतावे लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याने अधिकाऱ्यांच्या या मनमानी वागणुकीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

एकीकडे सोयगाव तालुका दुष्काळाने होरपळला असून शासनाकडून अद्यापही शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही. मजुरांना रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक गावातील तांड्यावरील मजूर वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी करिता परजिल्ह्यात गेले आहे. तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असून तालुक्यात अनेक समस्यां असून राज्याचे पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या दिमागदार अभिष्टचिंतन सोहळ्याची उलटसुलट चर्चा मात्र तालुक्यात रंगली आहे.

Related Articles

Back to top button