जगातील कोणताही चमत्कार विज्ञानावर आधारित असतो. शहाजी भोसले यांचे प्रतिपादन.

सोयगाव दि. ०४ (वृत्तसेवा) अनेक भोंदू बाबा विज्ञानाचाच आधार घेऊन चमत्काराचे प्रयोग करतात परंतु त्यातून भोळ्या भाबड्या समाजाची फसवणूक करतात. अशा भोंदू बाबांच्या कृत्यांचा भांडाफोड करण्याचे काम सातत्याने महा. अंनिस करीत आहे. अशा भोंदू बाबा – बुवापासून सावध रहावे, असे आवाहन महा. अंनिसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी एका बैठकीच्या अध्यक्षपदावरून केले. शाखा भेटीच्या निमित्ताने सोमवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रधान सचिव साहित्यिक, कवी प्रा. शिवाजी वाठोरे, सुनील चौथमल, प्रकाश दौड, दिलीप शिखरे आदी उपस्थित होते. या वेळी श्री.भोसले यांनी काही चमत्काराचे सादरीकरण व त्या मागील विज्ञान उलगडून सांगितले.
प्रा. शिवाजी वाठोरे या वेळी बोलताना म्हणाले की, समाजात अलीकडच्या काळात सुशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या लोकातही मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे. तिचे उच्चाटन करणे हे अवघड काम अंनिस कार्यकर्ते सातत्याने करीत आहेत. त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. असे असले तरी प्रामाणिकपणे कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करीत आहेत, त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. असेही ते म्हणाले. तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून सांगण्यासाठी ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचायचे आहे. त्यासाठी अनिसच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे असे त्यांनी कार्यकर्त्याना सांगितले.
बैठकीचे सूत्रसंचालन शाखा प्रधान सचिव ईश्वर इंगळे यांनी केले. तर कार्याध्यक्ष संदीप इंगळे यांनी आभार मानले. या वेळी शाखेची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. बैठकीस कृष्णा पाटील, डिगांबर गिरी, दिलीप शिंदे, बाळू शिंदे, शे. गुलाब शे. अहेमद (मामु), ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे, गणेश कापरे, संभाजी पवार, भगवान दणके, अनिल लोखंडे आदी सदस्य उपस्थित होते.



