सोयगाव प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली.
सोनानदी पात्रात पाटबंधारे यांच्या अर्थपूर्ण संबधातून पाणी उपसा..

सोयगाव दि. ११ (वृत्तसेवा) छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सोना नदी पात्रातून पाणी उपसा सुरूच असून याबात तहसीलदार मोहनलाल हारणे, मंडळ अधिकारी मारोती धोंडकर, तलाठी पवार, ग्रामसेवक सत्यनारायण फुलेवाड, पाटबंधारे विभागाचे रोषण महाजन, व भेंडे यांना वारंवार विनंती करून देखील अर्थपूर्ण संबधातून पाणी उपसा चालू ठेवत असल्याने आमखेडा गावातील आड, विहिरी, बोअरवेल यांची पातळी घटली आहे. त्यामुळे आमखेडा येथील ग्रामस्थांनी प्रशासना विषयी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी दि. २६/१०/२०२३ रोजी एका आदेशानुसार सूचना केल्या होत्या कि, उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात एक संयुक्त पथक स्थापन करून प्रत्येक तालुक्यातील पाणी उपसा बंद करण्यात यावा. परंतु सोयगाव तालुक्यात या पथक मध्ये कोण आहे. नेमके कारवाई करणार कोण यांच्यातच संभ्रम निर्माण झाला आहे. तहसीलदार मोहनलाल हारणे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणतात कि आम्ही संबधित विभाग यांना पत्राद्वारे कळविले आहे. मात्र विद्युत महावितरण अभियंता सांगतात कि, आम्हाला अद्याप काही पत्र नाही. हे काम पाटबंधारे विभागाचे आहे. त्यांचे पत्र मिळाल्या कि कारवाई करू असे विद्युत महावितरण चे अधिकारी भिडे सांगतात. तर पाटबंधारे विभागाचे रोषण महाजन यांना कॉल करून सांगितले असता तर ते सोयगाव परिसरात येऊन पाणी उपसा करणारे यांच्या भेटी घेऊन कारवाई न करताच निघून जातात. त्यामुळे सोयगाव परिसरात पिण्याची पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता आहे. पथकातील तलाठी यांना गोपनीय माहिती दिली कि सोयगाव – आमखेडा शिवारात पाणी उपसा चालू असून तर तलाठी हे कारवाई न करता जो व्यक्ती पाणी उपसा करीत असेल त्यांना गोपनीय माहिती देणाऱ्याचे नाव सांगून गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण करीत आहे. याबाबत आमखेडा येथील व्यक्तीने तहसीलदार यांना सोशल मीडियाद्वारे माहिती दिली असता. पंचनामा करण्यात आल्याचे खोटे आश्वासन देऊन तहसीलदार हारणे यांनी कारवाई करण्यात टाळाटाळ केली असल्याचे आमखेडा येथील तरुणाचे म्हणणे आहे. करिता जिल्हा अधिकारी यांचा आदेश हा रद्दीत जमा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी स्थापन केलेले पथक कागदावरच…
१. उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी (महसूल) अध्यक्ष, २. तहसीलदार :- सदस्य, ३. गटविकास अधिकारी :- सदस्य, ४. मुख्याधिकारी नगरपंचायत :- सदस्य, ५. उपविभागीय अभियंता पाटबंधारे :- सदस्य सचिव, ६. उपविभागीय अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी :- सदस्य, ७. तालुका कृषी अधिकारी :- सदस्य, ८. पोलीस निरीक्षक :- सदस्य, असे पथक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी दि. . २६/१०/२०२३ रोजी आदेशित केले असतांना सोयगाव तालुक्यात अर्थपूर्ण संबधातून वरील पथक कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.


