महाराष्ट्रराजकीय

महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसावी यासाठी प्रशासनाची सक्ती…

सोयगाव दि. ०१ (वृत्तसेवा) सिल्लोड येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि. २ ऑगस्ट शुक्रवारी महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांची संख्या असावी यासाठी अधिकाऱ्यांकडून सक्ती केली जात असल्याने महिलांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. मागील वेळेस संभाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस जेवण तर दूरच पाणी सुद्धा प्यायला मिळाले नव्हते अशी खंत सेविकांनी बोलून दाखवली होती. दरम्यान सोयगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व बचत गटात असणाऱ्या महिलांनी उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना देण्यात येऊन सिल्लोड येथे होत असलेल्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहायचे असून कोणतेही कारण ऐकले जाणार नाही अशी सक्ती संबंधित अधिकाऱ्यांनी केली असल्याची चर्चा अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटातील महिला यांच्यात चर्चा रंगली होती. सिल्लोड येथे जाण्यासाठी महिलांशी संपर्क साधला जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याचे गांभीर्य अधिकाऱ्यांनी लक्षात न घेता सक्ती केल्याने महिलांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कारवाई होईल या भीतीमुळे महिला समोर येण्यास धजावत नाही. शुक्रवारी सकाळी आठ वाजता तयारीत राहा जाण्यायेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना सेविकांना देण्यात आल्या आहे. वाहनांची जबाबदारी ग्रामसेवकांवर देण्यात आली असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर महिलांनी सांगितले. तालुक्यातील प्रमुख कार्यालयाचे अधिकारी सोयगावात ठाण मांडून होते. काही अपरिहार्य घटना घडली त्यास कोण जबाबदार राहील हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सोयगाव तालुक्यातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिल कार्यालयात पायपीट करावी लागत असल्याने महिला सशक्तीकरण कार्यक्रमावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

बचत गटात असणाऱ्या महिला यांना मुख्यमंत्री यांच्या सभेकरिता अभियानात कार्यरत असलेल्या सी. आर. पी. ताई / उपजीविका यांनी प्रत्येकी ५० महिलांचे नियोजन करावे तसेज सदर कार्यक्रमा करिता आपल्या साठी गाडी असणार आहे. तेंव्हा फक्त महिला यांनी गाडी मध्ये बसून कार्यक्रम स्थळी घेऊन येण्याची जबाबदारी घेऊन सीआरपी ताई व उपजिवीका ताई यांनी महिला सोबत यावे असा मॅसेज बीएमएमयु, सीआरपी बँक या व्हाट्सएप ग्रुपवर व्हायरल होत आहे.

३७ पैकी २० बसेस मुख्यमंत्री यांच्या दिमतीला…

सोयगाव बस आगाराकडे ३७ बसेस असून त्यातील २० बसगाड्या या मुख्यमंत्री लाडकी बहिणींना सिल्लोड येथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला असणार आहे. उर्वरित १७ बसगाड्या पैकी पाच बसेस ह्या जग प्रसिद्ध अजिंठा लेणी येथे प्रवासी सेवेत असून १२ बसगाड्यांवर सोयगाव तालुक्याचा भार येणार असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून जनतेला वेठीस धरले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Related Articles

Back to top button