सोयगाव येथील जागृत भैरवनाथांची चैत्रपौर्णिमेला यात्रा. भैरवनाथ संस्थानाची जय्यत तयारी..
सोयगाव पंचक्रोशीत भैरवनाथ यात्रे निम्मित उत्साह.

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) सोयगाव शहराचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा जागृत भैरवनाथ महाराज चैत्रपौर्णिमा दि. २३ मंगळवारी होत असलेल्या यात्रोत्सवाची अंतिम तयारी संस्थानच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. मराठवाडा, खान्देश व विदर्भासह राज्यातुन दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी असते. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेले जागृत भैरवनाथ महाराजांची स्वयंभू व संपूर्ण लोण्याची मूर्ती आहे.

शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या भैरवनाथांचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. भैरवनाथांची स्वयंभू मूर्ती असून संपूर्ण लोण्याची आहे. चैत्रपौर्णिमेला याठिकाणी मोठी यात्रा भरत असते. भाविकांनी कबूल केलेला नवस चैत्रपौर्णिमेला फेडला जातो. यात्रेदरम्यान कबूल करण्यात आलेला नवस बारा गाड्या ओढून व डाळ बट्टीचा नेवैद्य दाखवून पूर्ण केला जातो. नवस कबूल केलेल्या भाविकांची व दर्शन साठी येणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी असते. नवस फेडणाऱ्या भाविकांसह भक्तांसाठी पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरिता संस्थांनच्या वतीने पिण्याच्या पाण्याची टँकर द्वारे व्यवस्था करण्यात येते. संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला, रवींद्र काळे, राजू अहिरे, राजेंद्र जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीचे सदस्य व स्वयंसेवकानी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे यात्रेला गालबोट लागणार नाही असे कृत्य करू नये असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
भाविकांनी आपल्या पाल्याचा कबूल केलेला नवस फेडण्यासाठी चैत्रपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यास सायंकाळी हळद लावून वाजतगाजत मानाची असलेली पाटलाची बैलगाडीची पूजा करून नारळ वाढवावे लागते. त्यानंतर मारुतीचे दर्शन घेऊन या ठिकाणी नारळ वाढवून लोहाराचा गळ याची पूजा करून तिथे पण नारळ वाढवून घरी आणले जाते. त्यानंतर दुसऱ्यादिवशी चैत्रपौर्णिमेला बारागाड्या ओढून भैरवनाथांचा कबूल केलेला नवस फेडला जातो.
या मंदिराचे वैशिष्ट्ये :-
- भैरवनाथ मंदिरातील महाराजांची मूर्ती ही पूर्णपणे लोण्यापासून तयार करण्यात आलेली आहे.
- हि मूर्ती चाळीस पन्नास वर्षांपूर्वीची आहे. येथील मूर्तीच्या लोण्यावर लोणी टाकून ही मूर्ति उभी राहिलेली आहे.
- इथे यात्रेच्या दिवशी बारा गाड्या पण ओढण्याची पद्धत आहे, हे दृश्य पहायला या ठिकाणी सर्वजण उत्सुक असतात.
- नवसाला पावणारा जागृत भैरवाथ महाराज असे प्रचलित आहे.
- एप्रिल महिन्याच्या भरणाऱ्या यात्रेसाठी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, माहेरी कानाकोपऱ्यातून भाविक नवस करण्यासाठी येत असतात.
भैरवनाथ मंदिर जाण्याचा मार्ग :-
हे सुप्रसिद्ध बौद्ध लेण्या अजिंठा च्या जवळ आहे. तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे जाण्यासाठी तुम्हाला थेट छत्रपतीसंभाजी नगर वरून सोयगाव बस मिळेल सुमारे ११७ किलोमीटर आहे. तसेच खांदेश मधून येणाऱ्यांसाठी जळगाव येथून ५५ कि.मी. अंतर आहे.

वर्ष भर भैरवनाथ मंदिर येथे नेहमीच वरदळ असते. विशेष म्हणजे आठवड्यातील प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच इतर यात्रेत उत्सवाच्या दिवशी भैरवनाथ महाराज मंदिरावर लाखो भाविक नवस करण्यासाठी येतात. येथील भाविक भक्ताचा प्रसाद म्हणून त्यांना डाळ बट्टी चे जेवण दिल्या जाते. तसेच इथे बारा गाड्या ओढून म्हणजे या मध्ये सहभाग घेऊन लोक आपआपले नवस फेडतात.



