पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात गोर गरीब रुग्णांना १०८ रुग्णवाहिका वेळेवर मिळेना…
रुग्णांचे नातेवाईक व रुग्ण सेवकांकडून बी.व्ही.जी. कंपनीवर कारवाईची मागणी....

सोयगाव दि. ०९ (वृत्तसेवा) पालकमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार दि. १८ रविवार रोजी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आमखेडा शिवाजीनगर येथील रहिवासी कडूबा हरी गाडेकर वय ५८ वर्षे यांना दि. १८ रविवारी दुपारी दोन च्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने. त्यांच्या मुलगा दत्तात्रय गाडेकर यांनी ०२:१५ मि. १०८ ह्या नंबर वर कॉल केला असता त्यावेळी त्यांना सांगितले कि, तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध नाही. कडूबा गाडेकर यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिला. यावेळी संदीप इंगळे या तरुणाने १०८ या भ्रमणध्वनीवर दुपारी ०३:१६ मि. संपर्क केला असता १०८ ह्या नंबरवरील कॉल स्विकारणाऱ्याने तब्बल २२ मिनिट कॉल चालू ठेवत सांगितले कि, आम्ही दोन मिनिटांत आपल्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो असे म्हणत कॉल कट करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा ०३:४६ मिनिटांनी १०८ ह्या नंबर वर इंगळे यांनी कॉल केला असता त्यांनी सांगतिले कि, अजिंठा येथील रुग्णवाहिका पाठविण्यात आली परंतु रुग्णवाहीकेला स्टेपनी नसल्याने व समोरील टायरचे तार निघालेले असतांना सायंकाळी ०४:५० मिनिटांनी अजिंठा येथील रुग्णवाहिका सोयगाव ग्रामीण रुग्णालय येथे पोहचली. तब्बल दोन ते अडीच तासानंतर रुग्णवाहिका रुग्णास घेऊन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर कडे निघाली. अजिंठा येथील रुग्णवाहिकेची अडचण असल्याने पडशी वडोद येथे दुसऱ्या रुग्णवाहिकेत रुग्णास स्थलांतरीत करण्यात आले. यामुळे रुग्णासह रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. दरम्यान सोयगाव येथील १०८ ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथून एक वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे एका रुग्णास घेऊन जाण्यासाठी निघाली. हि रुग्णवाहिका तब्बल चार तासानंतर ०५:१५ मि. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात परत आली. यामुळे सोयगाव तालुक्यात १०८ या रुग्णवाहिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या कडे लोकप्रतिनिधींसह बी.व्ही.जि. कंपनीने दुर्लक्ष केल्याने अनेक गोर गरिबांना जीव गमवाना लागला आहे. पालक मंत्र्याच्या मतदारसंघातच रुग्णांना १०८ रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याने रुग्ण सेवाकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठांकडून काय कारवाई केली जाते या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.



