१ लाखावर आहे थकबाकी? मग नावे होणार सार्वजनिक.
त्वरीत भरणा करण्याचा मनपाचा इशारा.

चंद्रपूर दि. ०५ (वृत्तसेवा) लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे ८ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असुन ८ मार्च पर्यंत करभरणा न केल्यास १० मार्च रोजी अश्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली जाणार आहेत.
शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाने थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे.
१ लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा केला जात आहे. त्यांना यासाठी ८ मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली आहे.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे विविध माध्यमातुन प्रसिद्ध केली जाणार आहे.



