महाराष्ट्र

श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन.

चंद्रपूर दि. ०६ (वृत्तसेवा) चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे बुधवार ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मनपाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनीचे व उपलब्ध सोयी सुविधेचे जिल्हाधिकारी यांनी स्टॉल्सला भेट देत कौतुक केले. सदर प्रदर्शनीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन दरवर्षी मूर्ती खरेदीचे हेच स्थान निश्चित राहावे अश्या भावना भेट देणारे नागरिक व्यक्त करीत आहेत.
     येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्सवास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जावे लागते यावर उपाय म्हणुन चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनीत नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार आहे.उत्सव काळात होणारी गर्दी वाहतूक कोंडी यामुळे निर्माण होऊ शकणार नसुन नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता येणार आहे शिवाय या मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील २० भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु इस्त्री, मिक्सर स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत.त्यामुळे नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येत आहे.
अधिकाधिक नागरिकांना या प्रदर्शनीस भेट देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. याप्रसंगी मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त अक्षय गडलिंग, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गेलवार, नरेंद्र बोबाटे, सचिन माकोडे, शहर अभियंता विजय बोरीकर, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी तसेच आदी अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button