बनोटी, नागद वनपरिक्षेत्रात डेरीदार वृक्षांची सर्रास अवैधरित्या तोड, विटभट्ट्यांमध्ये लाकडांचा वापर.
वनविभागाची कारवाई शून्य.

सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) सोयगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या वनपरिमंडळ बनोटी व नागद अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात अवैधरित्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून कत्तल केलेली मोठी लाकडे सॉ मिल धारकास व काही लाकडे वीटभट्टी धारकांना विकली जात आहे. वीटभट्टी धारकांकडून लाकडांचा विटभट्ट्यांमध्ये सर्रास वापर केला जात आहे. याबाबत सोशल मिडिया च्या माध्यमातून वनविभागास माहिती देऊनही बनोटी व नागद हद्दीतील विटभट्ट्या धारकांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने वृक्ष तोडीचे प्रमाण वाढले आहे. अवैधरित्या वृक्ष तोड करणारांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न वृक्षप्रेमीं मधून विचारला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या बनोटी व कन्नड वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागद वनपरिमंडळ हद्दीत असलेल्या मोहळाई, हनुमंतखेडा, बनोटी, वरठाण, निंभोरा, गोंदेगाव या ठिकाणी असलेल्या विटभट्ट्यांमध्ये लाकडांचा सर्रास वापर केला जात आहे. मात्र वनविभागाकडून आतापर्यंत वीट भट्टी धारकांवर कारवाई करण्यात आलेली नाही. लाकडांची तस्करी करणाऱ्यांवर एखादी अपवाद वगळता लाकूड तस्करांवर देखील कारवाई करण्यात आली नसल्याने दिवसेंदिवस अवैधरित्या वृक्ष तोड करण्याची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी वृक्ष तोड करून साठवण करून ठेवली आहे. सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना याबाबत अनेक वेळा सोशल मिडियाद्वारे माहिती दिली असता, वनकर्मचारी यांना याबाबत सूचित करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे असे मिसाळ हे सांगतात मात्र कारवाई करण्यात आली किंवा नाही हे गुलदस्त्यात आहे. वनविभागाची वीटभट्टी धारकांवर शून्य कारवाई असल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर वृक्षप्रेमींनी प्रश्न उपस्थित केला आहे. याप्रकरणी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांची पुराव्यानिशी डीएफओ छत्रपती संभाजीनगर यांच्यासह जिल्हाधिकारी व वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे वृक्षप्रेमीं नी सांगितले.


