‘शाळे’ साठी विद्यार्थ्यांची चिखल, पाण्यातून जीवघेणा प्रवास… संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे.
सततच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, शाळकरी विद्यार्थ्यी, महिलांसह वयोवृद्ध ग्रामस्थांना अडचणी.

सोयगाव दि. ०७ (प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यातील गलवाडा (अ) येथील शिवाजीनगर भागातील रस्त्यांची मुसळधार झालेल्या पावसामुळे दुरावस्था झाली असून पाणी साचत चिखल झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी जीव मुठीत घेऊन शाळा गाठावी लागत असल्याने ग्रामसेवक यांना वारंवार तोंडी विनंती करून देखील दखल घेतली नाही. यामुळे संतप्त महिला व नागरिकांनी दि. ०६ शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत ला टाळे ठोकून चावी व निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोयगाव तालुक्यातील गलवाडा (अ) ग्रामपंचायत पालकमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असून काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागात निकृष्ठ दर्जाचे भूमिगत गटाराचे काम करण्यात आले. निकृष्ठ दर्जाच्या झालेल्या भूमिगत गटारी बाबत स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करून देखील चौकशी करण्यात आली नाही. ना.अब्दुल सत्तार यांच्या दहशतीमुळे अधिकारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे. भूमिगत गटारीच्या कामांमुळे पक्का सिमेंट रस्ता फोडण्यात आला. शाळेच्या समोरील भागात रस्ता पुर्ण खोदण्यात आला. त्यामुळे चांगल्या रस्त्यातच मोठ मोठे खड्डे पडले आहे. पावसामुळे त्याठिकाणी पाण्याचे डबके साचून चिखल होत आहे. गावातील महत्त्वाचा मुख्य रस्ता असून अतिवृष्टीमुळे रस्त्यावर सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांना खूप अडचणी येत आहेत. पायी जाताना – येताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी व चिखलात पाय फसतात, त्यामुळे विध्यार्थ्यांना चप्पल, बूट हातात घेऊन चिखलातून वाट काढत जावे लागते. त्यामुळे पायात काटे रुततात. अनेकदा पाय घरून मुले पडतात. यात अनेकदा मुलांचे वह्या-पुस्तके, दप्तर आदी चिखलात खराब होतात. तसेच गावातील वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी, महिला यांना खूप त्रास होत आहे. तात्काळ चांगला रस्ता करून घ्यावा, अशा मागण्या तोंडी स्वरुपात ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे केल्या. परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी याकडे जानिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे उपस्थित महिलांनी सांगीतले.
आज सकाळ पासूनच महिला व ग्रामस्थ हे ग्रामसेवक यांच्या प्रतिक्षेत होते. परंतु ग्रामसेवक व सरपंच हे कार्यालयात आले नसल्याने व रस्ता दुरुस्ती न केल्याने संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे दुपार येऊन चार वाजेच्या सुमारास टाळे ठोकले. व प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लेखी निवेदन व ग्रामपंचायत कार्यालयाला लावलेल्या कुलुपाची चावी गटविकास अधिकारी यांना देऊन जो पर्यंत गावातील रस्ता सुरळीत होत नाही, तो पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय देखील उघडण्यात येऊ नये. तसेच भूमिगत गटारीच्या कामाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची देखील मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे. दिलेल्या निवेदनावर रामचंद्र तायडे, शिवाजी जाधव, राहुल इंगळे, अजय सोनवणे, सौ. अनिता कल्यानकर, लक्ष्मी मंगरे, सरला कांडेलकर, साधना सुरवाडे यांच्या सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



