जि.प. प्रशालेचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष, कंत्राटदाराची मनमानी.

सोयगाव दि. २६ (वृत्तसेवा) सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या नूतन खोल्यांचे बांधकाम करण्याचा कंत्राट लिमरा इन्फ्राप्रोजेक्ट्स ला देण्यात आला आहे. १९५७९९३६/- रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या शाळेच्या खोल्यांचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे. उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड, शाखा अभियंता राजेश राजगुरू हे कामाकडे फिरकत देखील नाही. तर शाकावर यांना माहिती देऊनही कंत्राटदारास सूचना करण्यास धजावत नसल्याने शाळेच्या खोल्यांच्या बांधकामा पूर्णत्वास येण्या अगोदरच शाळेच्या खोल्यांच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंत्राटदारास राजकीय पाठबळ असल्याने संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आदर्श शाळा विकास योजने अंतर्गत सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेच्या नूतन खोल्यांचे बांधकाम करण्यासंबंधी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी अटींच्या आधीन राहून मे लिमरा इन्फ्राप्रोजेक्ट्सला कंत्राट दिला असून कार्यारंभ आदेश ही देण्यात आला आहे. उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली १९५७९९३६/- रुपये खर्च करून जिल्हा परिषद प्रशालेच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. कार्यारंभ आदेशात दिलेल्या अटींना कंत्राटदाराकडून तिलांजली दिली जात आहे. बांधकाम ठिकाणी कामाचा माहिती फलक ठरवून दिलेल्या नमुन्यात लावणे बंधनकारक असून देखील कामाठिकाणी फलक लावण्यात आलेले नाही. राजकीय पाठबळ असल्याने कंत्राटदार मनमानी करीत सुरुवाती पासूनच बांधकामात वाळूचा उपयोग न करता खडीचा बारीक कच (फफुटा) चा वापर करीत आहे. कामावर काम करणाऱ्या कामगारांचा विमा कंत्राटदाराने उतरविला आहे किंवा नाही. हे सुद्धा गुलदस्त्यात आहे. निकृष्ठ होत असलेल्या बांधकामाकडे शाखा अभियंता राजेश राजगुरू यांनी दुर्लक्ष केले आहे. राजकीय पाठबळ असल्याने गटशिक्षण विभाग सुद्धा निकृष्ठ होत असलेल्या बांधकामावर हरकत घेण्यास तयार नाही. शाळेच्या खोल्यांच्या होत असलेल्या निकृष्ठ बांधकामाची चौकशी जिल्हा परिषद बांधकाम विभाग करणार की राजकीय दबावाला बळी पडून निकृष्ठ बांधकामास मूक संमती देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निकृष्ठ बांधकामामुळे भविष्यात ज्ञानार्जनासाठी शाळेत जाणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांचा जीव मात्र टांगणीला राहणार आहे.
ना. अब्दुल सत्तार यांच्यासह अधिकाऱ्यांचे कामाकडे दुर्लक्ष….
ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते झालेल्या शासकीय कार्यालयांच्या इमारत बांधकाम कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याची पाहणी स्वत: ना. सत्तार यांनी केली. आदर्श शाळा विकास योजने अंतर्गत सोयगाव येथील जि. प. प्रशालेच्या खोल्या बांधकाम भूमिपूजन न करताच कंत्राटदाराने सुरु केल्याने ना. सत्तार हे शाळेकडे फिरकलेच नाही. पाहणीचा गाजावाजा करणाऱ्या नामदारांच्याच प्रयत्नातून होत असलेल्या शासकीय इमारतींचे काम खडीचा कच (फफुटा) वापरून निकृष्ठ दर्जाचे केले जात आहे. अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर जनतेसमोर नामदार अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्याचे नाटक करतात प्रत्येक्षात मात्र जैसे थे वैसे स्थितीत कामे चालू आहे. अधिकारी चौकशी करून कारवाई करण्यास धजावत नसल्याने कंत्राटदार मनमानी करीत आहे.



