महाराष्ट्र

आदर्श शाळा बांधकामात ठेकेदार करीत आहे आदर्शपणे घोटाळा….

बांधकाम निकृष्ठ दर्जाचे, राजकीय दबावामुळे अधिकारी कामाकडे येईना.....

सोयगाव दि. १५ (प्रतिनिधी) आदर्श शाळा विकास योजने अंतर्गत सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या नूतन खोल्यांचे काम सुरू असून सदरील बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केले जात आहे. शाळा खोल्यांच्या कामामध्ये मातीचा भराव केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार दि. १५ रविवारी उघडकीस आल्याने संतप्त नागरिकांनी कंत्राटदाराच्या कामावरील मजुरांना विनंती केली, भराव केलेली माती काढून घ्यावी. मजुराने कंत्राटदाराशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता कंत्राटदारांने नागरिकांना दम भरीत खडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने नागरिक संतप्त झाले होते. यावेळी रवी काळे राष्ट्रवादी शहराध्यक्ष (शरद पवार गट) यांनी नागरिकांना दिलासा.
याबाबत सविस्तर माहिती अशी, आदर्श शाळा विकास योजने अंतर्गत सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशाळेच्या नूतन खोल्यांचे बांधकाम करण्यासंबंधी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी अटींच्या आधीन राहून मे. लिमरा इन्फ्राप्रोजेक्ट्सला कंत्राट दिला असून कार्यारंभ आदेश ही देण्यात आला आहे.  उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेश राजगुरू कनिष्ठ अभियंता जि. प. उपविभाग सिल्लोड यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. कंत्राटदाराला राजकीय पाठबळ असल्याने राजेश राजगुरू हे बांधकामा ठिकाणी फिरकत नसल्याने कंत्राटदार मनमानी करीत आहे. दि. १५ रविवारी खोल्यांचा भराव करतांना मातीचा भराव करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संतप्त नागरिकांनी कामावरील मजुरास विनंती केली शाळेचे काम आहे. गोरगरिबांची मूल या शाळेत शिक्षण घेतील त्याकरिता आपण मातीचा भराव काढून घ्यावा. कामावरील मजुराने भ्रमणध्वनीद्वारे कंत्राटदार यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी कंत्राटदाराने उपस्थित नागरिकांवर खडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने नागरिक संतप्त झाले होते. यावेळी जिल्हा परिषद शाळा परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष (शरद पवार गट) रवी काळे यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून नागरिकांना दिलासा दिला. १,९५,७९९३६/- रुपये खर्च करून जिल्हा परिषद प्रशालेच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. कार्यारंभ आदेशात दिलेल्या अटींना कंत्राटदाराकडून तिलांजली दिली जात आहे. बांधकाम ठिकाणी कामाचा माहिती फलक ठरवून दिलेल्या नमुन्यात लावणे बंधनकारक असून देखील कामाठिकाणी फलक लावण्यात आलेले नाही. राजकीय पाठबळ असल्याने कंत्राटदार मनमानी करीत आहे. जो पर्यंत वरीष्ठ अधिकारी बांधकामा ठिकाणी येत नाही तो पर्यंत काम सुरू न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.


जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड यांनी ग्रामस्थांच्या विनंती वरून सत्य परिस्थिती बघून शाळा खोल्यांचे बांधकाम व माती ने केलेला भराव याचा पंचनामा केला यावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहे.

“जि. प. प्रशाला येथील खोली बाधंकाम हे कच मध्ये करीत असुन भराव माती मध्ये करीत असल्याचे मी कार्यकारी अभियंता शाकावार याना व्हिडीओ मोबाईल द्वारे लाईव्ह दाखविले आहे. वरीष्ठ अधिकार्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता बांधकाम ठिकाणी प्रत्यक्ष येऊन कामाचे मुल्यमापन करून कार्यवाही करावी. अटी व शर्थीचे पालन कंत्राटदार करीत नसल्याने कंत्राटदारास समज द्यावी. कामास आमचा विरोध नाही. काम चांगल्याप्रकारे व्हावे ही आमची भूमिका आहे.” श्री. रवी काळे, शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस (एस.पी.गट).

Related Articles

Back to top button