महिला व बालविकास विभागाची सर्वसमावेशक बैठक.
कोविडमुळे पालक गमावलेल्या ११५ बालकांना लाभ देण्यास मान्यता.

छत्रपती संभाजीनगर दि. ७ (वृत्तसेवा) कोविड १९ कालावधीत एक अथवा दोघेही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक तसेच अन्य खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी १० हजार रुपयांचा लाभ ११५ पात्र बालकांना देण्यास जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या सर्वसमावेशक बैठकीत मान्यता देण्यात आली.
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सर्व समावेशक समितीचे बैठकीचं आयोजन बुधवारी (दि.७) करण्यात आले होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती जाधव, बालकल्याण समिती अध्यक्ष श्रीमती. आशा शेरखाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव, जिल्हा परीविक्षा अधिकारी डी एल राठोड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, जिल्हा संरक्षण अधिकारी श्रीमती वर्षा शेळके तसेच पोलीस विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, समाज कल्याण विभाग,म.न.पा. महिला व बाल विकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र व अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या समन्वयाने कोविड १९ मुळे एक वा दोन्ही पालक दगावलेल्या ११५ बालकांना शैक्षणिक साहित्य शालेय व वसतीगृह शुल्क इत्यादी करिता पात्र बालकांना १० हजार रुपये पर्यंतचा लाभ देण्यास जिल्हा कृती दलाने मान्यता दिली.
तसेच प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मंजुरी समितीमार्फत २९२ बालकांना लाभ देण्यास समितीने मान्यता प्रदान केली. तसेच भिक्षा मागणाऱ्या ८ व ३ बाल कामगारांना असे एकूण ११ बालकांना बालगृहामध्ये प्रवेशित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जिल्ह्यात ४३ बालविवाह रोखण्यात आल्या व दोन प्रकरणात पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाईल्ड लाईन व संबंधित पोलीस स्टेशनला प्रोत्साहन पत्र देण्याची व स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून काम अधिक परिणाम करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. मुलींचे बालगृह क्षमता पूर्ण झाली असल्याने मुलीचे नवीन बालगृह सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.



