मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचे लेकरे शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत !
जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र्य दिन आला तरी गणवेश मिळाला नाही, जि.प. शिक्षण विभाग झोपेत....

सोयगाव दि. १४ (वृत्तसेवा) शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला, तरीही सोयगाव तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळाले नाहीत. आज स्वतंत्र्य दिन असून देखील प्रशासनाच्या अनागोदी कारभारामुळे स्वतंत्र्य दिनी देखील विद्यार्थी जुने गणवेश घालून जात असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली. अनेक विद्यार्थी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत जात आहेत. बहीण लाडकी, भाचे मात्र शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. मामांना सांगा कि भाच्याकंडे पण लक्ष द्यावे. अशी चर्चा तालुक्यातील शाळेंवर ऐकायला येत आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुपस्थिती व गळतीचे प्रमाण कमी होऊन १०० टक्के उपस्थिती वर्गामध्ये राहण्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके पुरविले जातात. योजनेच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना दोन गणवेश, बूट आणि दोन पायमोजे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. सोयगाव तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ९८ व जिल्हा परिषेद माध्यमिक ०२ शाळा अश्या आहेत. तर प्राथमिक अनुदानित ०४ व माध्यमिक अनुदानित १४ शाळा तालुक्यात आहे. त्यातच स्वयंअर्थसहित शाळा यांनी तर गणवेशाच्या नावे दुकानदारीच चालू केली आहे.
प्रक्रिया बदलली; पण गणवेशच नाही !
मोफत गणवेश योजनेत शाळा व्यवस्थापन समितीला निधी देऊन त्यानुसार गणवेश खरेदी करण्यास सांगण्यात येत होते. मात्र, यंदापासून योजनेत बदल करण्यात आला. यंदा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत गणवेश शिवून घेण्यात येणार आहेत. कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले. परंतु, अद्यापही गणवेश मिळाले नाहीत. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांसोबत एक गणवेश देण्यात येणार होता. परंतु पुस्तके देण्यात आली आहेत, मात्र गणवेशाचा अद्यापही पत्ताच नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रक्रिया बदलकरून देखील शालेय विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहे.
स्वतंत्र्य दिनी देखील विद्यार्थी गणवेश विनाच राहणार…
शाळा सुरू होऊन तब्बल दिड महिना लोटला आहे. १५ ऑगस्ट आली तरी अद्याप गणवेश नाही. काही ठिकाणी गोरगरिबांची मुले रोज फाटके कपडे घालुन शाळेत येतात. ही परिस्थिती किती दिवस चालणार आहे? शासन एकीकडे लाडकी बहिन योजना राबवत आहे, तर त्याच बहिनीची लेकरं फाटकी वस्त्र परिधान करुन शाळेत येत आहे. बहिनीला १५०० रुपये देण्यापेक्षा तिच्या लेकरांना तीनशे रुपयांचा गणवेश देणार आहे की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या अनागोदी कारभारामुळे विद्यार्थी हे स्वतंत्र्य दिनी गणवेशा विना राहणार असल्याने मुख्यमंत्री महोदय यांनी या कडे लक्ष द्यावे अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.



