महिंद्रा रुलर हॉउसिंग फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक…
शेतकऱ्याने दिला उपोषणाचा इशारा...

सोयगाव दि. १० (वृत्तसेवा) महिंद्रा रुलर हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सोयगाव शाखेतून पत्नीच्या नावे कर्ज घेतेवेळी शाखेत जामीनदार म्हणून दिलेल्या कागदपत्रांची दुसऱ्या कर्जदारास कागदपत्रे जोडून व बनावट सही करून कर्जदार व शाखेतील कर्मचाऱ्याने संगनमत करून फसवणूक केल्याची लेखी तक्रार दि. १९ मार्च रोजी सोयगाव पोलीस ठाण्यात फसवणूक झालेले विश्वनाथ कोथलकर यांनी दिली मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने दि. २५ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे दि. १० बुधवारी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, महिंद्रा रुलर हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सोयगाव येथील शाखेतून चार वर्षांपूर्वी घरबांधकाम करण्यासाठी माझी पत्नी नामे श्रीमती सुनंदाबाई विश्वनाथ कोथलकर रा. आमखेडा ता.सोयगाव यांचे नावावर दीड लाख कर्ज घेतले असून त्याची वेळेवर नियमित परतफेड करीत आहे. माझ्या पत्नीच्या नावे कर्ज घेतेवेळी मी महिंद्रा रुलर हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सोयगाव शाखेत कागदपत्रे दाखल केली होती. मात्र याच शाखेतून एका कर्जदाराने कर्ज घेतले त्या कर्जदारास मला न विचारता शाखेच्या कर्मचारी व कर्जदाराने संगनमत करून माझे कागदपत्रे व बनावट सही करून कर्जदारास जामीनदार म्हणून वापरत माझी फसवणूक केली आहे. संबंधित कर्जदाराने महिंद्रा रुलर फायनान्स लिमिटेडचे कर्ज वेळेवर परतफेड केली नसल्याने माझे सिव्हिल रेकॉर्ड कमी झाले आहे.त्यामुळे मला इतर कुठेही कर्ज मिळत नाही. महिंद्रा हॉऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सोयगाव येथील शाखेत विचारणा करण्यासाठी गेलो असता तेथील कर्मचारी मला योग्य माहिती देत नसल्याने मी त्यांना रितसर तक्रारी अर्ज दाखल केला असता अर्जाची पोहच देण्यास देखील नकार देत आहे. शेती व मजुरी करून माझा व माझ्या कटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. कर्जदार व शाखेतील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून माझे शाखेत जमा असलेल्या कागदपत्रे व बनावट सही करून माझी फसवणूक केली आहे. झाल्यामुळे बँक मला कर्ज देत नसल्याने शेतीच्या मशागती लागणाऱ्या खर्चाची मोठी चिंता निर्माण झाली आहे. मला तात्काळ न्याय मिळावा अन्यथा मी दि. २५ एप्रिल रोजी तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, तहसीलदार व संचालक महिंद्रा रुलर फायनान्स लिमिटेड वरळी मुंबई यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


