महसूल सेवक (कोतवाल) यांना चौथ्या श्रेणीचा दर्जा द्यावा – सोयगाव येथे निवेदन.

सोयगाव दि. १५ (वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य महसूल सेवक (कोतवाल) संघटनेच्या सोयगाव शाखेच्या वतीने आज तहसील कार्यालयास निवेदन सादर करून महसूल विभागात कार्यरत असलेल्या मानधनावर काम करणाऱ्या महसूल सेवक (कोतवाल) यांना शासनाने तत्काळ चौथ्या श्रेणीचा कर्मचारी दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात सांगण्यात आले की, महसूल विभागात ग्राम पातळीवर महत्त्वाचे काम करणारे महसूल सेवक (कोतवाल) हे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, जनगणना, निवडणूक, पीक पाहणी, पीक विमा, मतदार नोंदणी, राशनकार्ड, विविध शासकीय कार्यक्रम, कृषी व इतर जनसंपर्क कार्य, तसेच कार्यालयीन कामांसाठी दिवसरात्र सेवा देत आहेत. मात्र शासनाच्या निर्णयांपासून ते वंचित राहिले असून त्यांना कोणतेही लाभ मिळत नाहीत.
शासनाने यापूर्वी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमध्ये त्यांच्या सेवांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना न्याय मिळावा यासाठी संघटनेच्या वतीने दिनांक १२ सप्टेंबर २०२५ पासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनास सर्व महसूल सेवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून हे आंदोलन नागपूर येथील पुढील टप्प्यासाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेने निवेदनाद्वारे सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची आणि कोतवाल यांना शासनमान्यता देण्याची विनंती केली आहे. दिलेल्या निवेदनावर शिवाजी शेरे, संजय नावकर, संभाजी बोरसे, मनोज आगे, समाधान जाधव, समाधान गोराडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



