संपादकीय

वऱ्हाडी मंडळींचा मुहूर्त काढणार घाम, नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत २९ मुहूर्त पार, मार्चमध्ये सोळा.

सोयगाव  दि. १९ (वृत्तसेवा) यंदा विवाह मुहूर्तासाठी कुठेही ब्रेक नसल्याने तुळसी विवाहनंतर जून महिन्यापर्यंत तब्बल ८१ मुहूर्त आले आहेत. त्यापैकी अनेकांनी नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत हिवाळ्यातील मुहूर्ताना काहीशी पसंती दिली असली तरी यापुढे कडक उन्हाच्या चटक्यात येणारे विवाह मुहूर्त वहऱ्हाडी मंडळीचा चांगलाच घाम काढणार असल्याचे बोलले जात आहे.
फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत ५२ विवाह मुहूर्त आहे. अनेकजण शेतीची कामे संपल्यानंतर मार्च ते मे महिन्यातील विवाह मुहूर्ताना पसंती देत असतात. त्यामुळे भर उन्हाळ्यात येणारे हे विवाह मुहूर्त वर आणि वधु पक्षाकडील वन्हाडींचा चांगलाच घाम काढणार आहे. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी आतापासूनच उन्हाचा कडाका वाढायला लागला आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी जास्त वाढली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षीच्या विवाह मुहूर्तात सर्वाधिक १६ विवाह मुहूर्त मे महिन्यात आहेत. त्यामुळे अनेकजण सुट्टीमुळे मे महिन्यातील मुहूर्ताना पसंती देतात. यामुळे उन्हापासून बचाव करताना दोन्ही पक्षाकडील मंडळींची चांगलीच दमछाक होणार आहे.
जूनपर्यंत ५२ मुहूर्त, मे मध्ये लगीनघाई ;- लॉन्स, डीजे, स्वयंपाकी बुक करण्यावर भर.
विशेषतः मे महिन्यात वादळ वारे सुटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अनेकजण या महिन्यातील विवाह मंगल कार्यालयातच उरकण्यावर भर देत असतात. त्यासाठी अनेकांनी आतापासूनच मे महिन्यातील मुहूर्तासाठी लॉन्स, डीजे, स्वयंपाकी, आदी बुक करून ठेवले आहे.
डिजेमालकांना सुगीचे दिवस
यंदा सर्वाधिक विवाह मुहूर्त असल्यामुळे डिजेमालकांना सुगीचे दिवस राहणार आहेत. आजकाल प्रत्येक विवाह सोहळा डिजेशिवाय पार पडत नाही. त्यामुळे डिजेमालकही मुहूर्त पाहून आपल्या डिजेची सुपारी ठरविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा नोव्हेंबर ते जूनपर्यंत सर्वाधिक ८१ विवाह मुहूर्त होते. त्यापैकी फेब्रुवारी ते जूनपर्यंत अद्याप ५२ मुहूर्त बाकी आहेत. यात सर्वाधिक मे महिन्यात मुहूर्त आहेत.

यापुढील विवाह मुहूर्त
फेब्रुवारी : ७,१३, १६, १७, २०, २१, २२, २५
मार्च : १, २,३, ७, १२,१४, १६, १८, १९, २०, २१, २५, २९, ३०
एप्रिल : १४, १६, १८, १९, २०, २१, २५, २९, ३०
मे: १, ५, ६,८, १०, १४, १५, १६, १७, १८, २२, २३, २४, २७, २८
जून : २, ४, ५, ७, ८.

Back to top button