यूपीएससी परिक्षेत नितीन बोडखे यांनी यश संपादन केल्याने सोयगाव येथे सत्कार.

सोयगाव दि. २७ (वृत्तसेवा) अथक परिश्रम करीत बिकट वाटेवर मात करून नितीन बोडखे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ६७७ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले त्यामुळे क्रांती जनहित बहुउद्देशिय विकास संस्थेच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात आमंत्रित करुन सत्कार करण्यात आला. नितीन बोडखे यांचे लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्या नंतर आईने पतीचे दु:ख विसरून तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा सांभाळ केला. स्वतः भाजीपाला विकून नितीन ला शिकवले. देशातील सर्वोच्च परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करीत देशात आपल्या यशाचा झेंडा रोवत वालसावंगीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नितीन बोडखे हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्याने घामाचे मोती झाल्याचे गौरवोद्गार नितीनची आई सुमन बोडखे यांनी काढले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला त्यात पूर्ण देशातून ६७७ वा क्रमांक मिळवत नितीन ने मोठी मजल मारत आपले व आपल्या आईचे नाव कमावले आहे. दरम्यान, नितीन बोडखे याने मिळवलेल्या यशाची बातमी वाऱ्या सारखी पसरताच शुभेच्छांचा वर्षाव झाला. गावात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करण्यात आली. दरम्यान सन २००९ ते २०१२ या काळात नितीन ने सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आठवी ते दहावीचे शिक्षण घेतलेल्या नितीन बोडखे यांचा क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था व अंजनाई गो शाळेच्या आमखेडा ता. सोयगाव च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, सचिव दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर गाडेकर व अनिल लोखंडे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आमखेडा येथील सरपंच गजानन ढगे, वैभव आगे, वैभव अस्वार, नितीन ढगे, राजेंद्र ढगे, ओम पायघन, अशोक ढगे आदींची उपस्थिती होती.
“आज माझ्या मुलाने माझ्या कष्टाचे चीज करून दाखवले. त्याचे स्वप्न आज पूर्ण झाल्याने आमचा आनंद गगनात मावत नाही आहे. मला त्याचा अभिमान वाटतो आहे.” सुमनबाई बोडखे (नितीन च्या आई).

“स्वप्न पूर्ण करण्यात वेगळा आनंद, परिस्थितीची जाणीव आणि आईच्या अपार कष्टाची माहिती असल्याने मी हे यशसंपादन करू शकलो. अभ्यास करताना अडथळ्यांचा विचार न करता आपल्या कुटुंबाच्या कष्टांचा विचार करा. स्वतःला यश मिळेपर्यंत थांबूच नका. स्वप्नं मोठी बघा कारण ती मोठी स्वप्न पूर्ण करण्यात वेगळा आनंद असतो.” नितीन बोडखे.




